सीमेवर जवानांच्या हाती आले घातक शस्त्र
- चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांना अखेर 15 वर्षानंतर नवीन असॉल्ट रायफल्स मिळाल्या आहेत.अमेरिकन बनावटीच्या या नवीन रायफल्स दीर्घ पल्ल्याच्या असून सीमा रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठीच खास या असॉल्ट रायफल्सची निर्मिती करण्यात आली आहे.
- तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकन कंपनी सिग साउरसोबत भारत सरकारने 638 कोटी रुपयांचा रायफल्स खरेदीचा करार केला.तसेच त्यातील 72,400 पैकी पहिल्या 10 हजार रायफल्स लष्कराला मिळाल्या आहेत.
- 500 मीटरपर्यंत रेंज असलेल्या या सर्व असॉल्ट रायफल्स 2020 पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. करारानुसार, भारताला एकूण 72,400 SiG-716 असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.
- तर त्यापैकी सैन्याला 66,400 इंडियन एअर फोर्सला चार हजार तर, नौदलाला दोन हजार रायफल्स मिळणार आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने या रायफल्स अत्याधुनिक असून त्यांची देखभाल करणेही सोपे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिरीन दळवींनी केला साहित्य अकादमी पुरस्कार परत
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशात फूट पाडणारे आणि भेदभाव करणारे आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पक्षात लढणाऱ्या सहकाऱ्यांना साथ देण्यासाठी मी हा पुरस्कार परत करत आहे. असे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त शिरीन दळवी यांनी सांगितले.
शिरीन दळवी या लखनऊ येथील प्रसिद्ध उर्दू दैनिक ‘अवधनामा’च्या मुंबई आवृत्तीच्या माजी संपादक आहेत. राज्य सरकारकडून त्यांना 2011 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर केले यावर मी खूप दुःखी आहे. असेही त्या म्हणाल्या.
हा देशाची राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे. या अमानवीय विधेयकाचा निषेध करताना मी साहित्य अकादमी पुरस्कार 2011 परत देत असल्याची घोषणा त्यांनी केली.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी पुन्हा बोरिस जॉन्सन
ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाने (Conservative Party) दणदणीत विजय मिळवला आहे. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्त्वात हुजूर पक्षाने बहुमताचा ३२६ हा आकडाही पार केला. १९८० च्या दशकात मार्ग्रेट थॅचर यांच्या काळातील विजयानंतर हुजूर पक्षासाठी हा सर्वात मोठा विजय मानला जातो. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता हाऊस ऑफ कॉमन्सच्या एकूण ६५० जागांपैकी ६४२ जागांचे निकाल जाहीर झाले होते. यापैकी बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाने ३५८ जागा मिळवल्या होत्या. तर मजूर पक्षाने यापैकी २०३ जागांवर विजय मिळवला.
‘दिशा’ विधेयक मंजूर; बलात्काऱ्यांना २१ दिवसांच्या आत फाशी
- आंध्र प्रदेश विधानसभेचे शुक्रवारी ‘दिशा विधेयक’ पारित केलं. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. बलात्काऱ्यांना फाशी देणारं आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे.
- दिशा विधेयकाला आंध्र प्रदेश क्रिमिनल लॉ (सुधारणा) कायदा २०१९ म्हटले आहे. या विधेयकांतर्गत बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या अपराधाची सुनावणी जलद करत, २१ दिवसांच्या आत निकाल लावण्याची आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने दिशा विधेयक मंजूर केलं होतं. सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकरणांची सुनावणी चार महिने चालते.
- विधेयकात भारतीय दंड विधानाच्या ३५४ कलमात दुरुस्ती करण्यात आली असून ३५४ (ई) हे कलम बनवण्यात आलं आहे. सुधारणा कायद्यानुसार, अशा प्रकरणात जेथे साक्षीपुरावे उपलब्ध आहेत, तेथे तपास सात दिवसांत पूर्ण करून आणि पुढील १४ दिवसांत कोर्टात सुनावणी झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत शिक्षा दिली जावी असे म्हटले आहे.
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार
- ब्रिटनमध्ये आताच्या निवडणुकीनंतर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार प्रवेश करणार आहेत. सत्ताधारी हुजूर व विरोधी मजूर पक्षाकडून काही भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यात अनेक खासदारांनी आपले मतदारसंघ राखण्यात यश मिळवले असून भारतीय वंशाचे एकूण १५ खासदार नव्या सभागृहात असणार हे उघड झाले आहे.
- पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आताच्या निवडणुकीत नेत्रदीपक विजय संपादन केला असून आतापर्यंत सर्वात जास्त विविधता असलेले सभागृह अस्तित्वात येत आहे. त्यात वांशिक अल्पसंख्याक असलेले १० खासदार आहेत. आधीच्या संसदेतील सर्वच खासदार पुन्हा यशस्वी झाले आहेत.
जगातील १०० प्रभावी महिलांत सीतारामन
- फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला आहे. या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.
- यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा व बायोकॉनच्या संस्थापक किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.
- फोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.
- सीतारामन ३४ व्या क्रमांकावर असून त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.
- मल्होत्रा या ५४ व्या क्रमांकावर असून त्या एचसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी ८.९ अब्ज डॉलर्सची आहे. मजुमदार शॉ या ६५ व्या क्रमांकावर असून त्या स्वयंश्रीमंत महिलांमध्ये आघाडीवर आहेत. बायोकॉन या कंपनीची स्थापना त्यांनी १९७८ मध्ये केली होती. त्यांनी संशोधन व पायाभूत व्यवस्थेत गुंतवणूक केली आहे.
- फोर्ब्सच्या या यादीत गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेटस, आयबीएमच्या गिनी रोमेटी, फेसबुकच्या शेरील सँडबर्ग, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अरडर्न, इव्हान्का ट्रम्प, गायक रिहान व बियॉन्स तसेच टेलर स्विफ्ट, टेनिस पटू सेरेना विल्यम्स, हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांचाही समावेश आहे.[lwptoc colorScheme=”inherit”]