चालू घडामोडी (25 डिसेंबर 2019)
‘रिंग ऑफ फायर’ पाहण्याची उद्या संधी :
- यंदाच्या वर्षांतील शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबरला म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी होत असून पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून ते दिसणार आहे.
- भारत, सौदी अरेबिया, कतार, मलेशिया,ओमान, सिंगापूर, श्रीलंका, मरिना बेटे व बोरनिओ येथून सूर्यग्रहण दिसेल. यात ‘रिंग ऑफ फायर’चे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे.
- सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण दिसणार असून ते कंकणाकृती असेल. खग्रास सूर्यग्रहणापेक्षा ते वेगळे असेल. यातच सूर्याचा मधला भाग चंद्र मध्ये आल्याने झाकला जातो. त्यामुळे त्याची कडा प्रकाशमान दिसते, त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते.
- भारतात सकाळी 7.59 वाजता ग्रहणाला सुरुवात होणार आहे. यात कंकणाकृती अवस्था सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी दिसणार आहे. जास्तीत जास्त भाग झाकला जाण्याची अवस्था सकाळी 10.47 वाजता राहील.
- तर पूर्ण ग्रहण स्थिती सुटण्यास दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होईल, दुपारी 1.35 वाजता खंडग्रास अवस्थेतून तो बाहेर पडेल. एकलिप्स पोर्टलच्या मते कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्व सौदी अरेबियात दम्ममच्या पश्चिमेला सुरू होईल.
संरक्षणप्रमुख पदाला मंत्रिमंडळाची मंजुरी :
- तीनही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी संरक्षण प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) हे नवे पद निर्माण करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. संरक्षणविषयक मंत्रीगटाने हा प्रस्ताव सादर केला होता.
संरक्षण प्रमुख हे सरकारचे प्रमुख संरक्षण सल्लागारही असतील. - 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर संरक्षण दलांच्या फेरआढावा समितीने संरक्षण प्रमुख या पदाची निर्मिती करण्याची शिफारस केली होती. स्वातंत्र्यदिनी लाल किल्लय़ावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलातील सुधारणांचा उल्लेख करताना संरक्षण प्रमुख नेमला जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा
सल्लागार अजित डोव्हाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
तसेच संरक्षण प्रमुख ही चार तारे असलेल्या जनरलच्या बरोबरीची श्रेणी असेल. - तर लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांमध्ये समन्वय साधणे, संरक्षण मंत्रालयाला गरजेनुसार सल्ला देणे, संरक्षणविषयक वित्तीय मुद्दय़ावर सल्ला देणे ही कामे त्यांना करावी लागतील. तीन दलांच्या संयुक्त कारवाईचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांना असेल.
रेल्वे प्रवाशांसाठी ‘139’ नवा मदतकार्य क्रमांक :
- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘139’ हा नवा क्रमांक प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
- तर या क्रमांकावर संपर्क साधल्यास रेल्वे मदतकार्य, भारतीय रेल्वेबाबतची चौकशी करता येणार आहे.
रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 182 आणि इतर चौकशी करण्यासाठी एकात्मिक हेल्पलाइन क्रमांक 139 प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. - तसेच 1 जानेवारी 2020 पासून 139 क्रमांकाची सेवा सुरू होणार आहे. एकात्मिक हेल्पलाइन क्रमांक 139 आणि रेल्वे, आरपीएफ सुरक्षा हेल्पलाइन क्रमांकासाठी 182 क्रमांकावर प्रवासी संपर्क करू शकतात.
आयसीसी जागतिक क्रिकेट क्रमवारी जाहीर :
- भारताचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय प्रकाराप्रमाणेच कसोटीतही ‘आयसीसी’ जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. मात्र कसोटीचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची एका स्थानाने घसरण झाली आहे.
- कोहलीच्या खात्यात सर्वाधिक 928 गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील स्टीव्ह स्मिथपेक्षा (911) तो 17 गुणांनी पुढे आहे.
त्यामुळे वर्षांखेरीसपर्यंत तरी कोहलीच्या अग्रस्थानाला कोणताही धोका नाही. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन (864) आणि भारताचा चेतेश्वर पुजारा (791) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहे. युवा मार्नस लबूशेन (786) पाचव्या स्थानावर आहे.
तसेच पाकिस्तानच्या बाबर आझमने (767) श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या सलग दोन शतकांमुळे सहावा क्रमांक पटकावला असून रहाणे 759 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धात मनूला दुहेरी सुवर्णपदके :
- मनू भाकरने राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली.
- तर 17 वर्षीय मनूने वरिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 243 गुण मिळवले, तर कनिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 241 गुण मिळवले.
युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मनूने पात्रता फेरीत 588 गुण मिळवले. - वरिष्ठ गटात देवांशी धामाने रौप्य आणि यशस्वी सिंग देशवालने कांस्यपदक पटकावले. मनू आणि यशस्वी यांनी 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील स्थाने आधीच पक्की केली आहेत.
बंगळुरुजवळ उभारण्यात आलं पहिलं डिटेन्शन सेंटर :
- देशात कुठेही डिटेन्शन सेंटर नाहीत असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. मात्र कर्नाटकातील बंगळुरुपासून साधारण 40 किमी अंतरावर पहिलं डिटेन्शन सेंटर उभारण्यात आलं आहे.
- बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असलेल्या नेलमंगलाजवळ हे सेंटर उभारण्यात आलं आहे.
- केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2019 मध्येच हे डिटेन्शन सेंटर उभारण्यात येणार होतं. मात्र या कामाला काही प्रमाणात विलंब झाला. सध्या हे सेंटर बांधून पूर्ण झालं आहे.
- तर या डिटेन्शन सेंटरमध्ये एकूण सहा खोल्या आहेत. कर्नाटक सरकारने एका वसतीगृहाचे रुपांतर डिटेन्शन सेंटरमध्ये केलं आहे. या सेंटरमध्ये एक स्वयंपाकाची खोली आहे. तसंच सुरक्षा चौकीही आहे. विदेश प्रादेशिक नोंदणी कार्यालयाद्वारे घुसखोरांचा तपास करुन त्यांना अशा सेंटरमध्ये पाठवण्यात येतं.
दिनविशेष:
- 25 डिसेंबर हा दिवस ‘नाताळ‘, चांगले शासन दिन तसेच तुलसी पूजन दिन म्हणून साजरा केला जातो.
- बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक ‘पंडित मदन मोहन मालवीय‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1861 मध्ये झाला होता.
- भारताचे 10वे पंतप्रधान ‘अटलबिहारी वाजपेयी‘ यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
- सन 1976 मध्ये आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली.
- वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी सन 1990 मध्ये करण्यात आली.