चालू घडामोडी (26 डिसेंबर 2019)
पाणी व्यवस्थापनासाठी अटल भूजल योजना :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी येथे अटल भूजल योजना जाहीर केली. या योजनेद्वारे भूजलाचे व्यवस्थापन केले जाणार असून प्रत्येक घरी पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या १८ कोटी लोकांपैकी केवळ ३ कोटी लोकांनाच जलवाहिनीद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते.
या योजनेमुळे पुढील पाच वर्षांत उर्वरित १५ कोटी जनतेला स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांनी कमी पाण्यात होणारी पिके घ्यावीत असे सांगतानाच मोदी यांनी लोकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याची विनंती केली.
पश्चिम बंगालच्या मंत्र्याला बांगलादेशने व्हिसा नाकारला :
पश्चिम बंगालचे मंत्री व जमियत-उलेमा-इ-हिंद या संघटनेच्या राज्य शाखेचे अध्यक्ष सिद्दिकउल्लाह चौधरी यांना बांगलादेश सरकारने व्हिसा नाकारला आहे.
संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात व्यापक निदर्शने झाली होती. त्या पार्श्वभूमीवर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन व गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी त्यांची भारत भेट रद्द केली होती. यानंतर ही घडामोड घडली आहे. ‘मी दहा दिवसांपूर्वी व्हिसाकरिता अर्ज केला होता आणि प्रवासाची तिकिटेही काढली होती, असे त्यांनी सांगितले. चौधरी यांना व्हिसा नाकारण्यात आल्याचे बुधवारी कळवण्यात आले, मात्र त्याचे कुठलेही कारण देण्यात आले नाही.
‘मंत्री असल्यामुळे, कुठल्याही परराष्ट्राला भेट देण्यासाठी मला केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची परवानगी घ्यावी लागते. मला केंद्राकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि बॅनर्जी यांची परवानगी मिळाली होती. मात्र बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांनी मला व्हिसा नाकारल्याचे कळले आहे. दोन्ही देशांचे संबंध चांगले असल्याने, ही दुर्दैवाची बाब आहे. मी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेईन,’ असे चौधरी म्हणाले.
सिल्हेटमधील मदरशातील कार्यक्रमात पत्नी, मुलगी व नात यांच्यासह सहभागी होण्यासाठी त्यांनी बांगलादेशी व्हिसाकरिता अर्ज केला होता. सुधारित नागरिकत्व कायदा ताबडतोब मागे घेण्यात आला नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जेव्हा कोलकात्यात येतील, तेव्हा त्यांना विमानतळाबाहेर पडू देणार नाही, अशी धमकी अलीकडेच एस्प्लेनेड भागात झालेल्या जमियत-उलेमा-इ-हिंदच्या सभेत बोलताना चौधरी यांनी दिली होती.
कंकणाकृती सूर्यग्रहण – जाणून घ्या मुंबई-पुण्यासह कोणत्या शहरांमधून कधी दिसणार :
२०१९ मधील शेवटचे सूर्यग्रहण २६ डिसेंबरला म्हणजे आज होत असून पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून ते दिसणार आहे. विशेष म्हणजे भारतामधील अनेक शहरांमधून हे ग्रहण पाहता येणार आहे. जाणून घेऊयात कधी कुठे आणि कसं पाहता येणार आहे हे ग्रहण…
कोणत्या देशांमधून दिसणार?
- भारत
- सौदी अरेबिया
- कतार
- मलेशिया
- ओमान
- सिंगापूर
- श्रीलंका
- मरिना बेटे
- बोरनिओ
कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी – या ग्रहणादरम्यान ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण दिसणार असून ते कंकणाकृती असेल. खग्रास सूर्यग्रहणापेक्षा ते वेगळे असेल. यातच सूर्याचा मधला भाग चंद्र मध्ये आल्याने झाकला जातो. त्यामुळे त्याची कडा प्रकाशमान दिसते, त्यामुळे कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते.
भारतात कधी दिसणार – भारतात सकाळी ७.५९ वाजता ग्रहणाला सुरुवात होणार आहे. यात कंकणाकृती अवस्था सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी दिसणार आहे. जास्तीत जास्त भाग झाकला जाण्याची अवस्था सकाळी १०.४७ वाजता राहील. पूर्ण ग्रहण स्थिती सुटण्यास दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होईल, दुपारी १.३५ वाजता खंडग्रास अवस्थेतून तो बाहेर पडेल.
कंकणाकृती सूर्यग्रहण कुठून दिसणार – एकलिप्स पोर्टलच्या मते कंकणाकृती सूर्यग्रहण पूर्व सौदी अरेबियात दम्ममच्या पश्चिमेला सुरू होईल. ते भारतात दक्षिण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरू होईल. पहिल्यांदा ते कोईमतूरमध्ये कंकणाकृती स्थितीत दिसेल. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. स्लूह डॉट कॉम या संकेतस्थळावर सकाळी ८.३० पासून ग्रहणाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
महाराष्ट्रात खंडग्रास – दक्षिण भारतात केरळमधील कन्नूर, कसारगोड, थालसरी, पलक्कड आणि कर्नाटकातील मंगलोर, म्हैसूर व तामीळनाडूतील कोईमतूर, इरोडे, करुर, दिंडीगुल, कोझीकोडे, उतकमंड, शिवगंगा, तिरुचिरापल्ली, पुडकोट्टाई येथून कंकणाकृती दिसेल. महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातून ६० ते ७० टक्के खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.
निवडक ठिकाणच्या खंडग्रास सूर्यग्रहण स्थिती कशी असेल
- मुंबई ७९ %
- पुणे ७८ %
- सोलापूर ८१ %
- कोल्हापूर ८४ %
- नाशिक ७४ %
- नागपूर ६२ %
- जळगाव ६८%
- औरंगाबाद ७४ %
- अकोला ६८ %
तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा – सूर्यग्रहण असो वा नसो, सूर्याकडे थेट उघडय़ा डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे. सूर्यग्रहण पाहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित सोलर फिल्टर्स असलेले चष्मे घालण्याचा किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पाहण्याचा आग्रह धरा. सुरक्षित सौर चष्मे किंवा तज्ज्ञांनी सुचवलेल्या सुरक्षित पद्धतीनेच कुणीही, कोणत्याही ठिकाणावरून सूर्यग्रहणाचा आनंद लुटू शकतो, यात शंका नाही.
देशातील १३० कोटी जनता हिंदूच : मोहन भागवत :
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वावरून मोठं वक्तव्य केलं आहे. धर्म आणि संस्कृतीची पर्वा न करता ज्यांच्या मनात राष्ट्रवादाची भावना आहे आणि भारताच्या संस्कृतीप्रती आदर आहे ते हिंदू आहेत आणि देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असं मोहन भागवत म्हणाले. संपूर्ण समाज हा आपलाच आहे आणि एकात्मिक समाजाची निर्मिती करणं हे संघाचं उद्दिष्ट्य असल्याचं भागवत म्हणाले.
जी व्यक्ती भारताला आपली मातृभूमी मानते, देशातील जन, जल, जमीन, प्राणी यांसह संपूर्ण भारतावर प्रेम करते, भारताची भक्ती करते, भारताच्या संस्कृतीला आपल्या जीवनात स्थान देतो, अशी कोणतीही व्यक्ती जी कोणतीही भाषा बोलत असेल, ती कोणत्याही प्रांतातील असेल, पूजा अर्चना करत असेल किंवा करत नसेल तो भारतमातेचा सुपुत्र हिंदू आहे. त्यामुळे भारतातील १३० कोटी लोक हे हिंदूच आहेत. हा संपूर्ण समाज आपला आहे आणि असा एकात्मिक समाज निर्माण करण्याचे संघाचे ध्येय आहे, असं भागवत म्हणाले.
सर्वांच्या प्रगतीसाठी आपण एकत्र यायला हवं. या विचारालाच जग हिंदू विचार मानते. हाच भारताचा परंपरागत विचार आहे. लोकं म्हणतात आम्ही हिंदूत्ववादी आहोत. परंतु आम्ही परंपरेने हिंदुत्ववादी आहोत, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सर्वांचा विचार करतो आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही ते यावेळी म्हणाले. विविधतेत एकता हे प्रचलित वाक्य आहे.