दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली
Story of Quick Heal Antivirus’s Birth
नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.
कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला मराठी मिडीयम शाळेत घातलेलं. पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.
तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.
एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता. त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.
किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल?
नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं. सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं,
” याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”
कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.
नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.
एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले.
टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.
स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.
त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.
या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.त्यांच्या धाकट्या भावाने संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.
त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं
*क्विक हील.*
*साल होत १९९५.*
संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,पकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.
त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विक हिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.
अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.
आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय यावर कोण विश्वास ठेवणार नाही.
तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल. आणि हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलान.
👉विशेष माहिती : हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता. हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏